कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिराच्या सुरक्षेबाबत हायकोर्टाने दिले हे आदेश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंदिरांची सुरक्षा आणि त्यासंदर्भातील मुद्दे बरेचदा न्यायालयात चर्चेला आले आहेत. यातून मंदिराची सुरक्षा एकमेव उद्देश साध्य करण्यात आला आहे. परंतु, सध्या मुंबई उच्च न्यायालयात कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर व ज्योतिबा मंदिर येथील सुरक्षारक्षकांचा मुद्दा चर्चेला आहे.

महालक्ष्मी मंदिरातील जुने ४९ व ज्योतिबा मंदिरातील जुने १० सुरक्षारक्षक काढून त्यांच्या ऐवजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील शस्त्रधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक मंदिर ट्रस्टला करायची आहे. याला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून सध्या जुने सुरक्षारक्षक काढून नविन नेमणूक करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. पुढील सुनावणीमध्ये यासंदर्भात निर्णय होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे रक्षक या दोन मंदिरांच्या सेवेत सन 2016 पासून तैनात आहेत. त्यांना काढून नवे सुरक्षारक्षक नेमण्याची विनंती करणारे पत्र ट्रस्टने राज्य सुरक्षा महामंडळाला दिले. पण याविरोधात या सुरक्षारक्षकांनी ॲड. अविनाश बेळगे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने ट्रस्टला जुने सुरक्षारक्षक काढून नवीन नेमणूक करण्यास अंतरिम मनाई केली आहे. मात्र जुने सुरक्षारक्षक न काढता तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करू शकता, असेही न्यायालय म्हणाले. मात्र हे अंतरिम आदेश रद्द करावेत, अशी मागणी ट्रस्टने केली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंदिराचा युक्तिवाद

मंदिराला धोका आहे, आता जे सुरक्षारक्षक आहेत ते शस्त्रधारी नाहीत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सुरक्षारक्षक शस्त्रधारी आहेत. त्यामुळे जुने सुरक्षारक्षक काढून महामंडळाच्या शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे, असा युक्तिवाद ट्रस्टच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.

रक्षकांचा युक्तिवाद
मंदिर ट्रस्टच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या सुरक्षारक्षकांनी वकिलांच्या मार्फत महत्त्वाचा युक्तिवाद केला आहे. आता जे मंदिराची सुरक्षा बघतात त्यांची नेमणूक भाविकांना रांगेतून सोडण्यासाठी आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी करण्यात आली आहे. परिणामी त्यांना सेवेतून काढता येणार नाही, असा दावा त्यांनी याचिकेतून केला गेला आहे.

Kolhapur Mahalaxmi Jyotiba Temple Security Mumbai High Court