ब्रह्मा कुमारी आश्रमात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; नातेवाईकांकडून हत्येचा आरोप

लखनऊ- उत्तर प्रदेशाच्या बागपत येथील ब्रह्मा कुमारी आश्रमात एका महिलेनं फाशी घेतल्याचं उघडकीस आले. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. बागपतच्या टटरीस्थित ब्रह्मा कुमारी आश्रमात महिलेचा मृतदेह आढळून आले.

मात्र, मृत महिलेच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. मृत महिलेला घरातून पैसे आणण्यासाठी तगादा लावण्यात येत होता, असेही नातेवाईकांनी म्हटले आहे.

आश्रमातील मृत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शिल्पा असे मृत महिलेचे नाव असून पीडित कुटुंबीयांनी आमच्या मुलीचा हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, दोषींवर कारवाईची मागणीही करण्यात आली. ही घटना येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईस्वरीय विश्वविद्यालयातील असून ब्रह्मकुमारी शिल्पाचा मृतदेह येथील एका बंद खोलीत आढळून आला.

मृत शिल्पाला पैशांची मागणी करत सातत्याने त्रास देण्यात येत होता. त्यामुळेच, तिने आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. दरम्यान, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आग्रा येथील आश्रमातही दोन सख्या बहीणींनी फाशी घेऊन आत्महत्या केली होती.